छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली आहे. उद्या, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबईच्या दिशेने निघणार असून, यावेळी आपल्या समर्थकांनी मुंबईला येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. आपण एकटेच एका वाहनातून मुंबईला जाणार असून, सोबत केवळ दोन रुग्णवाहिका आणि दहा माणसे असतील, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईला जाण्याचा निर्णय मागे घेतलेला नसून, केवळ समाजाने मोठ्या संख्येने मुंबईला येण्याचा निर्णय बदलला आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. “मराठ्यांची खिंड आता मी एकटाच लढवणार आहे. मला कोण अडवते आणि कोण परवानगी नाकारते, ते आता पाहतो,” असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जरांगे यांनी गंभीर आरोप केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज मुंबईत दाखल झाल्यानंतर गोंधळ किंवा दंगल घडवण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने परवानगी नाकारली असल्याने आता आपण एकटे मुंबईत जात असून, सरकार आपल्याला परवानगी देणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जरांगे यांनी समर्थकांना गावातच सावध आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. मुंबईतील आंदोलनासाठी करण्यात आलेली वाहनांची तयारी आणि इतर व्यवस्था वाया जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. योग्य वेळ आल्यावर मराठा समाजाला मुंबईत बोलावले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुक्कामाच्या ठिकाणी अंतरवाली सराटी येथील उपोषणाप्रमाणे व्यवस्था उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. उपोषण सुरूच राहणार असून, कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नसल्याचा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला. “ही झुंज शेवटची आहे; जीव गेला तरी स्वाभिमानाला धक्का लागू देणार नाही,” असे म्हणत त्यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

347 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क