छत्रपती संभाजीनगर : “गणपती बाप्पा मोरया, आला रे आला”च्या जयघोषात लाडक्या गणरायाचे आज सोमवारी (दि. १४) घरोघरी मोठ्या उत्साहात आगमन होणार आहे. विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले असून, गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होत आहे. यंदा बाप्पांचा मुक्काम बारा दिवसांचा असल्याने गणेशभक्तांचा उत्साह आणखी वाढला आहे. नऊ वर्षांनंतर आलेला हा योग विशेष मानला जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संभाजीपेठ, निराला बाजार, गुलमंडी, मच्छलीखडक, केळीबाजार, सिटीचौक, जवाहर कॉलनी, गारखेडा आणि टीव्ही सेंटर परिसरात आठवडाभरापासून खरेदीची लगबग सुरू आहे. गणेशमूर्तींसह मखर, लाईटिंग माळा, मोती माळा, आर्टिफिशियल फुले, महालक्ष्मी हार, अगरबत्ती, धूप आणि पूजेच्या साहित्याला मोठी मागणी आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेक नागरिकांनी रविवारीच मूर्ती व सजावटीचे साहित्य खरेदी केले. मात्र, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे गणेशमूर्तींचे संरक्षण करताना विक्रेत्यांची धावपळ होत होती.
पर्यावरणपूरक मूर्तींना पसंती
जिल्हा परिषद मैदान, संभाजीपेठ, निराला बाजार, गुलमंडी, मच्छलीखडक, जवाहर कॉलनी, सेव्हन हिल, गारखेडा आणि टीव्ही सेंटर परिसरात विविध आकारांच्या गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. सहा इंचांपासून तब्बल १२ फूट उंचीच्या मूर्ती बाजारात असून, एक ते पाच फुटांपर्यंतच्या मूर्तींना सर्वाधिक मागणी आहे. तुलनेने किंमत अधिक असली तरी शाडू मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींना यंदा विशेष पसंती मिळत आहे.
मखरांचीही मोठी मागणी
गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी विविध रंगांचे, आकर्षक मखर उपलब्ध आहेत. फोम, नेट, जरीचे कापड आणि लाकडापासून तयार केलेल्या मखरांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. मखरांची किंमत ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत असून, मागणीनुसार ८ हजार रुपयांपर्यंतचे मखरही तयार केले जात आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*