छत्रपती संभाजीनगर : शहरासह जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी दुपारनंतर शहर व परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. चिकलठाणा वेधशाळेत सायंकाळपर्यंत ५ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, काही भागांत सायंकाळच्या सुमारास दमदार सरी झाल्या.

यापूर्वी ८ सप्टेंबर रोजी शहरात ५.५ मि.मी. पाऊस झाला होता. सप्टेंबर महिन्यातील १२ दिवसांत केवळ दोन दिवस पावसाची नोंद झाली आहे. शहर व आसपासच्या गावांत आतापर्यंत ३७८ मि.मी. पाऊस झाला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाने काही काळ दडी मारल्याने सप्टेंबरमध्येही उन्हाचा चटका जाणवत होता. शनिवारी झालेल्या पावसाने मात्र वातावरणात पुन्हा गारवा निर्माण झाला.

ग्रामीण भागातही पावसाची हजेरी

फुलंब्री तालुक्यात सुमारे दीड तास झालेल्या पावसामुळे मका, मूग आणि सोयाबीन पिकांना आवश्यक ओलावा मिळाला. दौलताबाद, खुलताबाद-वेरूळ परिसरातही सुमारे दोन तास रिमझिम सरी झाल्या. बाजारसावंगी आणि सुलतानपूर येथे तब्बल ४२ दिवसांनंतर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.

पैठण तालुक्यात जायकवाडी परिसर आणि ढोरकीन येथे हलका ते मध्यम पाऊस झाला. त्यामुळे कापूस, सोयाबीन, मका आणि तूर पिकांना फायदा होण्याची शक्यता आहे.

सोयगाव मंडळात २४, सावळदबारा येथे ५१, तर जरंडी येथे २२ मि.मी. पावसाची नोंद झाली. सोयगाव-जरंडी रस्त्यावर चिखल झाल्याने एक ट्रक रुतल्याची घटना घडली.

सिल्लोड तालुक्यात सरासरी ८.६३ मि.मी. पाऊस झाला. सिल्लोड येथे १६, गोळेगाव २०, अजिंठा १४ आणि अंभई येथे ८ मि.मी. पाऊस नोंदला गेला. जून ते ११ सप्टेंबरदरम्यान तालुक्यात ५१२.८८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

प्रकल्पांमध्ये समाधानकारक साठा

केळगाव आणि चारनेर प्रकल्प १०० टक्के भरले असून, खेळणा प्रकल्पात ८५ टक्के पाणीसाठा आहे. अजिंठा-अंधारी २.७१, उंडणगाव २.९९, राहिमाबाद १.४९, निल्लोड ८ आणि हळदा-जळकी प्रकल्पात १५.८४ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे.

शहरात शनिवारी कमाल तापमान २८.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

389 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क