छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६’ मध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशातील ४८ शहरांच्या यादीत मागील वर्षी ३६व्या क्रमांकावर असलेल्या शहराने यंदा तब्बल १८ क्रमांकांची झेप घेत १६वे स्थान पटकावले आहे. शहराच्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा हा परिणाम असल्याचे प्रशासनाने सांगितले.

हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने मागील काही वर्षांपासून विविध उपक्रम हाती घेतले आहेत. नाल्यांवर व्हर्टिकल गार्डन तयार करण्यापासून ते रस्त्यांची नियमित स्वच्छता करण्यापर्यंतच्या उपाययोजना करण्यात आल्या. रात्रीच्या वेळी स्वीपिंग मशीनद्वारे रस्त्यांची स्वच्छता केली जात असल्याने रस्त्यांवरील धूळ आणि मातीचे प्रमाण कमी करण्यास मदत झाली आहे.

महापालिकेच्या उपाययोजनांमुळे शहराचा वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) ९९ वरून ७६ पर्यंत सुधारला आहे. रस्त्यांवर साचणारी माती व धूळ वेळोवेळी हटविणे, कचरा संकलन व वाहतूक बंदिस्त वाहनांद्वारे करणे तसेच कचरा जाळण्यास प्रतिबंध करणे, यावर विशेष भर देण्यात आला आहे.

बांधकामांमधून निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बांधकाम साहित्याची योग्य हाताळणी आणि धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही केली जात आहे. पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढविणे, हरित क्षेत्र वाढविणे, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यावरही भर दिला जात आहे.

मागील वर्षी शहराला १५५ गुण, तर यंदा १७८ गुण मिळाले आहेत. पुढील वर्षी शहराला देशातील टॉप टेनमध्ये आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले. महापौर समीर राजूरकर यांनीही आगामी काळात स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रणाच्या कामांना अधिक गती देण्याचे स्पष्ट केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

189 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क