छत्रपती संभाजीनगर शहरात : ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना लक्ष्य करणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा नवा डाव समोर आला आहे. ‘पेन्शन कार्ड’ मिळवून देण्याचे आमिष दाखवत ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ७ लाख २० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित वृद्धाच्या व्हॉट्सअॅपवर ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या नावाने पेन्शन कार्डसाठी अर्ज असल्याचे सांगणारा पीडीएफ फॉर्म पाठवण्यात आला. फॉर्म भरताना अडचण येत असल्याचे लक्षात घेत आरोपीने व्हॉट्सअॅप कॉल करून मदत करण्याचा बनाव केला. त्यानंतर “दोन दिवसांत पेन्शन कार्ड घरपोच मिळेल” असे सांगत संबंधित व्यक्तीकडून बँक खात्याशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळवली.

सायबर तज्ज्ञांच्या मते, व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आलेला पीडीएफ हा मालवेअरयुक्त असण्याची शक्यता आहे. तो उघडल्यानंतर मोबाइलवरील नियंत्रण हॅकर्सकडे गेले असावे. त्यामुळे मोबाइलवरील स्क्रीन शेअरिंग किंवा अन्य तांत्रिक माध्यमातून बँकेचा ओटीपी न सांगताही तो आरोपींपर्यंत पोहोचला आणि त्याच्या आधारे खात्यातील रक्कम परस्पर काढण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

फॉर्म भरून झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रात्री पीडिताच्या मोबाइलवर खात्यातून पैसे वळते झाल्याचे संदेश येऊ लागले. खाते तातडीने बंद करेपर्यंत एकूण ७ लाख २० हजार रुपये विविध व्यवहारांद्वारे लंपास करण्यात आले होते.

या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेले पीडीएफ, लिंक किंवा फॉर्म उघडू नयेत, बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा वैयक्तिक तपशील कोणालाही देऊ नयेत, असे आवाहन केले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अशा संदेशांपासून सावध राहून कोणतीही शंका असल्यास संबंधित बँक किंवा सायबर पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

627 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क