अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने झेंडा चौक (मुकुंदवाडी) आणि आनंद गाडेनगर (नारेगाव) या भागांमध्ये धाड टाकून ६० हजार रुपयांच्या किमतीचा ६ किलो ३२४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या नेतृत्वाखाली २९ सप्टेंबर रोजी ही कारवाई पार पडली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शाम अतुल सोळंके (५५, रा. साईराजनगर, झेंडा चौक) आणि नंदू नेहरू तामचीकर (६०, रा. आनंद गाडेनगर, नारेगाव) अशी आहेत. सोळंकेकडून १ किलो १४५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला, तर तामचीकरकडून ५ किलो १७९ ग्रॅम गांजा मिळाला.
पोलिसांना खबर मिळाल्यानंतर, निरीक्षक बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या टीमने झेंडा चौक येथे छापा मारला. सोळंकेच्या घराची झडती घेतल्यावर त्याच्याकडून १५६ गांजाच्या पुड्या सापडल्या. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतर, तामचीकर हा आनंद गाडेनगरमध्ये खुलेआम गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तेथे धाव घेतली आणि तामचीकरला अटक केली. त्याच्याकडून ५ किलो १७९ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, नशेचे पदार्थ विकणाऱ्यांची किंवा वापरणाऱ्यांची माहिती ९५२९०१९०६१ या क्रमांकावर पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/EWGD6GJ4OQPBO1WIPiOfkA
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*