शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून हिट अँड रनच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गत आठवड्यात सलग चार घटनांची नोंद झाली होती. अशाच एका घटनेत जवाहनगर ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा एका भरधाव कारचालकाने ट्रीपलसीट दुचाकीस्वारांना उडवून देत अपघात करून घटनास्थळावरून पोबारा केला आहे. या अपघातात बेबी दत्तात्रय काथार (५४, रा. गल्ली क्र. १, न्यू हनुमाननगर) या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी जवाहरनगर ठाण्यात ६ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेबी काथार या पती आणि मुलासह कर्णपुरा येथे देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन आटोपून त्या दुचाकीवरून (एमएच २०, डीवाय ९६१२) घराकडे परतत असताना रो- पळेकर चौक- चेतक घोडामार्गे न्यू हनुमाननगरकडे येत होत्या. याच दरम्यान भरधाव वेगात आलेल्या कारचालकाने (क्र. एमएच २०, एव्ही १७५८) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात बेबी काथार यांना डोके, डोळा, कंबर, पाय, आणि ओटीपोटाला गंभीर मार लागला. अपघातानंतर कारचालक मदत न करता घटनास्थळावरून पसार झाला.
बेबी काथार यांना तातडीने त्यांच्या पती व मुलाने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार प्रल्हाद ठोंबरे करत असून, कारचालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*