House-Burglary-In-Sidco-Captured-On-CCTV
छत्रपती संभाजीनगर : सिडकोतील पवननगर भागात अज्ञात चोरट्याने घरफोडी करत १ लाख ४४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. संपूर्ण कुटुंब गावाकडे यात्रेला गेले असताना हा प्रकार घडला. चोरीची घटना रविवारी (२ मार्च) पहाटे उघडकीस आली.
आम्रपाली योगेश साळवे (२८, रा. पवननगर) यांनी यासंदर्भात सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, साळवे कुटुंबीय सिल्लोड तालुक्यातील धोत्रा येथे यात्रेसाठी गेले होते. चोरट्यांनी घराच्या कुलुपाला हात घालून आत प्रवेश केला आणि कपाटातील दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
रविवारी पहाटे घरी परतल्यावर घराचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले. घरात प्रवेश केल्यावर कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते आणि मौल्यवान दागिने गायब होते. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करून पंचनामा करण्यात आला. विशेष म्हणजे, चोरटे शेजारील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यांच्या आधारे पोलिस शोधमोहीम राबवत आहेत.
चोरीला गेलेल्या ऐवजात २ ग्रॅम वजनाची अंगठी, ३ ग्रॅम वजनाचे कानातले, १ ग्रॅम सोन्याचे मणी, ४ ग्रॅम सोन्याचे गहू मणी, ५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आणि २,२०० रुपये रोख यांचा समावेश आहे.
सिडको पोलिस चोरट्यांचा शोध घेत असून, लवकरच गुन्हेगारांना अटक होण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*