ब्रिटनमध्ये शिक्षण घेतलेल्या उद्योजकाच्या मुलास बीड बायपास परिसरातील महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या अभ्यासिकेतून विदेशी ओजी-कुश (हायब्रिड गांजा) विक्री करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. अमली पदार्थ प्रतिबंधक शाखेच्या पथकाने कारवाई करत त्याच्याकडून ४ लाख २८ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला. तपासादरम्यान देशी गांजाचा पुरवठा करणाऱ्या आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
प्रशील हिमांशू ब्रह्मा (२९, रा. कांचनवाडी, संभाजीनगर) आणि प्रकाश सलामपुरे (रा. गोलवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.
प्रशील ब्रह्मा याच्या अभ्यासिकेत विदेशी गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा मारत प्रशीलला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर, गोलवाडीत नगरपालिकेच्या पम्पिंग स्टेशन परिसरात प्रकाश सलामपुरे गांजाची झाडे लावत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी पम्पिंग स्टेशनवर छापा मारून कंपाउंडच्या आत लागवड केलेली दोन गांजाची झाडे जप्त केली.
प्रशीलने बीए हॉटेल-मोटेल प्रशासन व व्यवस्थापनाची पदवी ब्रिटनमधून पूर्ण केली होती. शिक्षणानंतर तो भारतात परत आला आणि त्याने अॅनिमेशन इन्स्टिट्यूट व ब्रह्मा अभ्यासिका सुरू केली. अभ्यासिकेत तो नाशिकच्या डॉ. ग्रीन नावाच्या पेडलरकडून २ ते ३ हजार रुपये प्रतिग्रॅम दराने ओजी-कुश गांजा खरेदी करून विद्यार्थ्यांना विकत होता.
या प्रकरणी सध्या सातारा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढीलतपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/K9Y55vdUS298mQnTz6IgYT
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*