छत्रपती संभाजीनगर : शहरातील मयूर पार्क परिसरात रविवारी (१५ मार्च) रात्री शतपावली करत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांची सोन्याची साखळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी हिसकावल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुकृपा हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या हर्षा महेश बाहेती या रविवारी रात्री जेवणानंतर घरासमोरील रस्त्यावर शतपावली करत होत्या. रात्री सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी अचानक त्यांच्या दिशेने धाव घेतली. काही समजण्याच्या आतच एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी जोरात ओढून काढली, तर दुसरा दुचाकीवर तयारच उभा होता. साखळी हिसकावून दोघांनी क्षणार्धात घटनास्थळावरून पळ काढला.

या अचानक झालेल्या प्रकारामुळे महिला घाबरून गेल्या आणि त्यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले होते. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु आरोपींचा काहीच मागमूस लागला नाही.

घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. फुटेजमध्ये संशयितांची हालचाल कैद झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, शहरात वाढत चाललेल्या साखळी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी फिरताना नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच, अशा घटनांवर आळा घालण्यासाठी गस्त वाढविण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

561 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क