छत्रपती संभाजीनगर : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाच्या वतीने ‘लबाडांनो पाणी द्या’ या घोषणेसह जनआंदोलनाची सुरुवात करण्यात आली. मुकुंदवाडी, बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौक, हर्सूल टी पॉईंट या प्रमुख ठिकाणी रिकाम्या हंड्यांचे तोरण बांधून आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.
संभाजीनगर महानगरपालिकेला दररोज 240 एमएलडी पाण्याची गरज असताना केवळ 140 एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. या असमतोलामुळे शहराला दररोज किंवा दोन दिवसाआड पाणी मिळायला हवे, मात्र प्रत्यक्षात 11 ते 12 दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितले की, “जनसामान्यांचा हक्काचा प्रश्न मांडण्यासाठी ठाकरे गट रस्त्यावर उतरला आहे. शहराला पुरेसे आणि वेळेवर पाणी मिळवून देण्यासाठी एल्गार पुकारण्यात आला आहे. पुढील एक महिन्याभर विविध आंदोलनांच्या माध्यमातून शासन-प्रशासनाला जागे करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.”
गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेली पाणी योजना अद्याप अपूर्ण असून उन्हाळ्यात 10 दिवसांनंतर पाणी येत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने ‘लबाडांनो पाणी द्या’ या अभियानाची घोषणा केली आहे.
या आंदोलनात रिकाम्या हंड्यांचे तोरण, नागरिक बैठका, सह्यांची मोहीम, ढोल बजाव आंदोलन, सायकल रॅली, महाविद्यालयीन युवकांशी संवाद, दवंडी, छायाचित्र प्रदर्शन, वार्ड पदयात्रा, कट्टा मीटिंग आणि जॅकवेल पाहणी यांचा समावेश असून, शहरातील विविध भागांमध्ये दररोज नव्या पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
शहरातील पाणीप्रश्नावर तोडगा निघेपर्यंत हे आंदोलन चालू ठेवण्यात येईल, असा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*