छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर फेमस होण्याच्या नादात तरुणाई अनेकदा अतिरेकी पावले उचलत असून, असाच एक प्रकार शहरातील हर्सूल परिसरात समोर आला आहे. आर्ताफ पटेल या तरुणाने चक्क पोलीस व्हॅनचा दरवाजा उघडत, कमरेला पिस्तूल लावून व्हिडिओ शूट केला आणि तो ‘इंस्टाग्राम’वर “हम जैसे लोगो के क्रश नहीं केस होते है मिस्टर” अशा आशयाच्या कॅप्शनसह अपलोड केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होण्याचा प्रकार घडला आहे.
ही घटना लक्षात येताच, सायबर पोलीस ठाण्याचे भुषण काशिनाथ राऊत यांनी हर्सूल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हर्सूल पोलिसांनी आर्ताफ पटेल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणे आणि पोलिसांची अधिकृत वाहने वापरून चुकीचा संदेश पसरवणे, हे गंभीर गुन्हे मानले जातात.
या प्रकरणाचा पुढील तपास हर्सूल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पागोटे करत आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
हा प्रकार इतर तरुणांसाठीही धोक्याची घंटा असून, सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*