छत्रपती संभाजीनगर: “तुम्ही अंगावर एवढे दागिने घालून फिरता, कालच खून झालाय!”या वाक्याने क्षणात घाबरलेले शेतकरी दाम्पत्य काही कळायच्या आतच दागिन्यांपासून हात धुऊन बसले! पोलिस असल्याचे सांगणाऱ्या तोतया टोळीने विश्वासात घेऊन तब्बल ५ तोळे सोने हातचलाखीने लंपास केलं. ही थरारक घटना शहरातील तिसगाव फाट्यावर २० एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता घडली असून, पुन्हा एकदा शहरात तोतया पोलिसांचा सुळसुळाट उघड झाला आहे.

लग्न आटोपून परतताना घडली घटना

गोकुळसिंग कवाल (वय ५५, रा. डोंगरगाव, सिल्लोड) हे पत्नीसह रविवारी शहरात नातेवाइकाच्या लग्नासाठी आले होते. लग्न आटोपल्यानंतर वाळूजमध्ये मुलीला भेटून ते दुचाकीवरून परत आपल्या गावी जात होते. नगर नाक्यावरून सावंगीच्या दिशेने जात असताना त्यांच्या मागे दोन दुचाकीस्वार लागले. तिसगाव फाट्याजवळील पुलाजवळ त्यांनी मोठ्याने आवाज देत त्यांना थांबवलं.

कवाल यांनी दुचाकी थांबवताच दोघांनी “किती वेळा आवाज दिला, थांबत का नाही?” असे म्हणत त्यांना दरडावले. पोलिस असल्याचं भासवत त्यांनी खोटं ओळखपत्रही दाखवलं आणि “कालच खून झालाय, तुम्ही एवढे दागिने घालून फिरताय” असं सांगत दागिने काढून पिशवीत ठेवण्यास भाग पाडलं. कवाल यांचा विश्वास बसल्याने त्यांनी हातातील अंगठ्या काढल्या, पत्नीनेही आपले दागिने काढले.

तोतयांनी कागद पुढे करत त्यात दागिने ठेवायला सांगितलं. कवाल यांनी त्याप्रमाणे सोनं त्या कागदात ठेवलं. त्यानंतर दुसरा कागद – ज्यात आधीच दगड ठेवलेले होते – त्यांनी हातचलाखीने कवाल यांच्या हाती दिला आणि त्वरित घटनास्थळावरून पसार झाले.

५ तोळ्यांचे दागिने लंपास

या फसवणुकीत ३ तोळ्यांची पोत, १ तोळ्याची एकदाणी आणि अर्धा तोळ्याच्या २ अंगठ्या असा एकूण ५ तोळे सोन्याचा ऐवज त्यांनी लंपास केला.

डमी साक्षीदारांचा वापर करून विश्वास संपादन

या टोळीच्या चलाख पद्धतीमुळे नागरिक सहज गंडतात. कवाल यांना फसवत असतानाच त्या ठिकाणी दोन दुचाकीस्वार थांबले. त्यांनीच टोळीचे साथीदार असल्याचे नंतर उघड झाले. त्यांनीही पोलिस असल्याच्या नावाखाली त्यांनाही दरडावल्याचा बनाव केला. त्यामुळे कवाल यांचा विश्वास अधिकच बळावला.

छावणी पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

849 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क