गजानन राऊत प्रतिनिधी / वाळूज : बजाजनगर परिसरात भगतसिंग शाळेजवळील मुख्य रस्त्यावर आज, २२ एप्रिल रोजी सकाळी सातच्या सुमारास एका ४८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख संतोष बाबुलाल सोनवणे (वय ४८, रा. त्रिमूर्ती नगर, रांजणगाव शेणपुंजी) अशी पटली आहे.
संतोष सोनवणे हे बजाजनगरातील एका खासगी कंपनीत कामाला होते. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या शशिकांत तावरे यांनी रस्त्याच्या कडेला मृतदेह पडलेला पाहून तत्काळ ११२ या पोलिस हेल्पलाईनवर माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस अंमलदार श्रीकृष्ण कांबळे आणि पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब काकड घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची तपासणी केली असता, कंबरेवर गंभीर जखम आणि परिसरात रक्तस्राव दिसून आला.
घटनास्थळी रुग्णवाहिका वेळेत न आल्याने पोलीस व्हॅनद्वारेच मृतदेह घाटी रुग्णालयात हलविण्यात आला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज जैन, शशिकांत तावरे व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला मदत केली. मनोज जैन यांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिल्याने पुढील कार्यवाहीला गती मिळाली.
घटना अपघात, घातपात की आत्महत्या याचा अंदाज सध्या स्पष्ट नसून, वाळूज एमआयडीसी पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*