छत्रपती संभाजीनगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांच्याविरोधात लढणारे राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे राजीनामा सुपूर्द करत पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.
राजीनाम्यामागचे कारण
राजू शिंदे यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले, “मी आणि माझे सर्व सहकारी शिवसेना पक्षाचा राजीनामा देत आहोत. उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांनी आमच्यावर विश्वास दाखवून विधानसभेची उमेदवारी दिली, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. मात्र, पक्षातील काही परिस्थितींमुळे आणि माजी खासदार खैरे यांच्या कार्यशैलीमुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे.”
विधानसभा निवडणुकीतील दमदार लढत
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राजू शिंदे यांना औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून मैदानात उतरवले होते. त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवार संजय शिरसाट यांना जोरदार टक्कर दिली होती. मात्र, १६,३५१ मतांनी त्यांचा पराभव झाला होता. शिरसाट यांना १,२२,४९८ मते मिळाली, तर शिंदे यांनी १,०६,१४७ मतं घेतली होती.
शिंदेंचा पुढील राजकीय प्रवास?
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राजू शिंदे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता लागली आहे. ते सत्ताधारी महायुतीतील एका पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना ठाकरे गटाची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*