मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातून बाहेर पडलेले माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
या प्रवेश सोहळ्याला शिवसेनेचे विधिमंडळातील मुख्य प्रतोद आमदार रमेश बोरनारे, उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना नेते रामदास कदम आदी मान्यवर उपस्थित होते. चिकटगावकरांसह डॉ. राजीव डोंगरे, माजी उपसभापती राजेंद्र मगर, माजी जि. प. उपाध्यक्ष दिनकर पवार, सुनिता साखरे, उत्तम निकम, रिखबचंद पाटणी, प्रशांत शिंदे, अमोल बावचे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले.
माजी आमदार चिकटगावकर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे वैजापूर मतदारसंघात त्यांची ताकद ठाकरे गटाच्या बाजूने गेली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना उमेदवारी न देता भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांना संधी दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी चिकटगावकर यांनी आमदार रमेश बोरनारे यांच्याशी चर्चा करून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला.
या प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत वैजापूर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे. प्रवेश सोहळ्याला माजी नगराध्यक्ष साबेर खान, उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, माजी जि. प. सदस्य दीपक राजपूत, बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव, संचालक गणेश इंगळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*