छत्रपती संभाजीनगर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारी (दि. ८) सायंकाळी ४ वाजता छत्रपती संभाजीनगर येथे टॉक शो आयोजित करण्यात आला आहे. गरवारे स्टेडियमजवळील प्रेसिडेन्ट लॉन्स येथे होणारा हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी असला, तरी शहरातील नागरिकांना हा शो प्रत्यक्ष पाहता यावा यासाठी ८० हून अधिक ठिकाणी एलसीडी स्क्रीनद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागातील नागरिक एकाच वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे विचार ऐकू शकणार आहेत.

या टॉक शोमध्ये मुख्यमंत्री शहरासाठीचे व्हिजन, भविष्यातील विकास आराखडा, गुंतवणूक धोरण, उद्योगवाढ तसेच शासन म्हणून छत्रपती संभाजीनगरसाठी कोणता विशेष प्लॅन आहे, यावर सविस्तर प्रकाश टाकणार आहेत. हा कार्यक्रम सुमारे तासाभराचा असेल, अशी माहिती शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिली आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाकडे संभाजीनगरकरांचे विशेष लक्ष लागले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री ठोस निर्णय जाहीर करतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. विशेषतः छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणाची घोषणा होऊनही अद्याप ठोस कामे सुरू न झाल्याने नाराजी आहे. पुणे आणि नागपूरप्रमाणे या प्राधिकरणाच्या माध्यमातून येथे अपेक्षित विकास झाला नसल्याचा सूर नागरिकांमध्ये आहे.

शहरातील पाणीप्रश्नही गंभीर बनला आहे. धरणात पुरेसे पाणी असूनही आणि शासनाकडून निधी मिळूनही शहराला आठवड्यातून केवळ एकदाच पाणी मिळत असल्याची परिस्थिती आहे. ‘दररोज पाणी कधी मिळणार?’ हा प्रश्न नागरिक सातत्याने उपस्थित करत आहेत.

याशिवाय रस्ता रुंदीकरणाचा मुद्दाही प्रलंबित आहे. रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण काढून जवळपास पाच हजार मालमत्ता साफ करण्यात आल्या, मात्र निधीअभावी पुढील कामे रखडली. त्यामुळे शहराचा चेहरा अधिक बकाल झाल्याची भावना आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या टॉक शोमध्ये या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडतील आणि शहराच्या भविष्यासाठी ठोस दिशा देतील, अशी अपेक्षा संभाजीनगरकरांकडून व्यक्त होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

605 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क