छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज विक्री व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आज दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी एका दिवसात मोठ्या प्रमाणावर हालचाल पाहायला मिळाली. निवडणूक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आजच्या अधिकृत आकडेवारीनुसार, आज ९११ नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली असून ३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
महानगरपालिकेतील विविध प्रभागांसाठी ही प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ ते ९ यांच्या कार्यालयांतून राबवण्यात आली. आज झालेल्या अर्ज विक्रीत सर्वाधिक अर्ज विक्री निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक ५ कार्यालयातून झाली असून येथे १४१ अर्जांची विक्री नोंदवण्यात आली आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक २ कार्यालयातून १३२, क्रमांक ७ कार्यालयातून १२८, क्रमांक ६ कार्यालयातून १२१, क्रमांक ३ कार्यालयातून १०९, क्रमांक १ कार्यालयातून ७१, क्रमांक ८ कार्यालयातून ७३ तर क्रमांक ९ कार्यालयातून ७४ अर्जांची विक्री झाली आहे.
आज दाखल झालेल्या ३ उमेदवारी अर्जांपैकी प्रत्येकी एक अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १, ७ आणि ८ यांच्या कार्यालयात दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही उमेदवारी अर्जांमध्ये उमेदवार हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असून, आज एकही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही, अशी माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे.
एकाच दिवसात झालेली मोठ्या प्रमाणावरील अर्ज विक्री पाहता शहरातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे. विविध राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज खरेदी केल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून, निवडणूक प्रशासनाकडून संपूर्ण प्रक्रिया शांततेत, नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*