छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या वेगात सुरू असून, यंदा निवडणूक आयोगाने लागू केलेल्या एका महत्त्वाच्या नियमामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली आहे. स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने उमेदवारांच्या घरी शौचालय असल्याचे शपथपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, उमेदवारी अर्जातील प्रत्येक रकाना अचूक आणि पूर्णपणे भरणे आवश्यक आहे. विशेषतः शौचालयासंदर्भातील रकान्यात ‘होय’ किंवा ‘नाही’ असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक असून, त्यासोबत आवश्यक शपथपत्र जोडणे गरजेचे आहे. हे शपथपत्र नसल्यास किंवा माहिती अपूर्ण असल्यास उमेदवारी अर्ज थेट बाद केला जाऊ शकतो. एवढेच नव्हे, तर निवडणूक जिंकल्यानंतरही जर संबंधित सदस्याकडे शौचालय नसल्याचे सिद्ध झाले, तर त्याचे पद रद्द होऊ शकते, अशी तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत जवळ येत असून, आता केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत. मंगळवारपासून अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्या दोन दिवसांत तब्बल ३,१७० अर्जांची विक्री झाली आहे. अर्ज बाद होऊ नयेत आणि कोणताही तांत्रिक दोष राहू नये, यासाठी अनेक माजी नगरसेवक व दिग्गज इच्छुक उमेदवारांनी आधी ‘डमी’ अर्ज भरून त्याची पडताळणी करून घेण्याचा मार्ग अवलंबला आहे. त्यानंतरच अंतिम अर्ज सादर केला जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात २०१६ साली करण्यात आलेल्या दुरुस्तीची यंदाच्या निवडणुकीत कडक अंमलबजावणी होत आहे. उमेदवाराच्या स्वतःच्या घरात शौचालय असणे आवश्यक असून, तसे नसल्यास सार्वजनिक किंवा सामुदायिक शौचालयाचा नियमित वापर करत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नऊ केंद्रांवर अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली असून, सुट्टीनंतर अर्ज केंद्रांवर गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने उमेदवारांना सर्व कागदपत्रांसह शपथपत्र वेळेत सादर करण्याचे आवाहन केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

876 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क