मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राजभवनात पार पडलेल्या दिमाखदार शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या ऐतिहासिक क्षणामुळे सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
शपथविधीनंतर राजभवन परिसरात उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी, पदाधिकाऱ्यांनी व समर्थकांनी “अजित पवार अमर रहे” अशा जोरदार घोषणा देत आपल्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली. या घोषणांमुळे वातावरण भावनिक झाले होते.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी हालचालींना वेग दिला. सकाळी देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल पटेल यांच्यासह प्रमुख नेत्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. याच ठिकाणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जनभावना आणि पक्षाची गरज लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमत झाले.
यानंतर सर्व नेते विधान भवनात दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात अजित पवार यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विधिमंडळ सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. शनिवारी झालेल्या या बैठकीत हा ठराव सर्व सदस्यांनी मान्य केला.
अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी तातडीने भरून काढणे आवश्यक होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची व सत्तेची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निर्णयाकडे महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*