छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन अवघा महिना उलटत नाही, तोच नवनिर्वाचित नगरसेवकांविरोधात तक्रारींचा भडिमार सुरू झाला आहे. निवडणूक विभागाकडे आतापर्यंत तब्बल १८ तक्रारी दाखल झाल्या असून, यामध्ये एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांविरोधात सर्वाधिक १६ तक्रारी आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उर्वरित दोन तक्रारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या प्रत्येकी एका नगरसेवकाविरोधात नोंदविण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या ११५ सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकांचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला होता. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ५७ जागांवर विजय मिळवला, तर शिवसेना शिंदे गटाचे १३ नगरसेवक निवडून आले. अशा प्रकारे महायुतीकडे एकूण ७० नगरसेवकांचे संख्याबळ आहे. दुसरीकडे, एमआयएमने ३३ जागांवर विजय मिळवत महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे.

दरम्यान, तक्रारींचे स्वरूप गंभीर असल्याचे समोर आले आहे. सन २००५ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दोन अपत्यांची अट लागू असून, तीन किंवा त्यापेक्षा अधिक अपत्य असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढविण्यास मनाई आहे. मात्र, या नियमाचे उल्लंघन करून दोनपेक्षा अधिक अपत्य असतानाही काही नगरसेवकांनी निवडणूक लढविल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या दोन ते तीन तक्रारी एमआयएमच्या नगरसेवकांविरोधात असल्याचे सांगण्यात येते.

याशिवाय, उमेदवारी अर्जात खोटी माहिती देणे, शहरातील सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण करणे, तसेच नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोपही काही तक्रारींमध्ये करण्यात आले आहेत. संबंधित नगरसेवकांची सदस्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदारांकडून करण्यात येत आहे.

नवनिर्वाचित नगरसेवकांविरोधात १८ तक्रारी प्राप्त झाल्याची पुष्टी उपायुक्त तथा निवडणूक विभागप्रमुख विकास नवाळे यांनी केली असून, सर्व तक्रारींची प्राथमिक छाननी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,028 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क