छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेत भाजप–शिवसेना युतीचे सत्तावाटप अखेर निश्चित झाले असून भाजपकडून समीर राजूरकर हे महापौरपदी विराजमान होणार आहेत, तर शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ यांना पुन्हा एकदा उपमहापौरपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आज दुपारी अधिकृत घोषणा होणार असून त्यानंतर नव्या नेतृत्वाचा कारभार सुरू होणार आहे.

महानगरपालिका निवडणुकीत ५७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेची प्रक्रिया वेगाने राबविली. युतीच्या सूत्रानुसार महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद शिवसेनेकडे देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी प्रवर्गातील निष्ठावंत कार्यकर्ते प्रा. गोविंद केंद्रे यांची भाजपच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी युतीची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, तिकीट वाटपापासूनच दोन्ही पक्ष मैत्रीपूर्ण पद्धतीने निवडणूक लढवत होते. हिंदुत्वाच्या विचारावर आधारित ही युती असून शहराच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार आहे. विशेषतः पाण्याचा प्रश्न, रस्ते, नागरी सुविधा यासाठी प्राधान्याने काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे विलास पारकर यांनी भाजप हा महायुतीतील मोठा भाऊ असल्याचे मान्य करत विकासाचे राजकारण करण्यावर भर दिला. मनपावर कायम भगवा फडकत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, महापौरपदासाठी दिग्गज नेत्यांमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. शहरातील मंत्री, खासदार, आमदार तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या समर्थकांनी आपापल्या उमेदवारासाठी जोरदार प्रयत्न केले. अखेर सर्व समीकरणे लक्षात घेऊन समीर राजूरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

नव्या नेतृत्वामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत असून भाजप–शिवसेना युतीकडून स्थिर आणि प्रभावी प्रशासनाची आशा व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IJbzVXxActY7zUsWoQ3lSr?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,488 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क