छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ लाख ८० हजार १७६ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून, त्यांना एकूण १ हजार ६३२ कोटी १२ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. संबंधित लाभार्थ्यांची माहिती विविध बँकांकडून शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, आधार संलग्नीकरण आणि इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे यांनी दिली.

या योजनेचा लाभ जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, सहकारी तसेच ग्रामीण बँकांकडून अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र, सध्या ७१२ खातेदारांची बँक खाती आधारशी संलग्न नसल्यामुळे त्यांच्या अर्जांची प्रक्रिया प्रलंबित आहे. संबंधित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

योजनेच्या निकषांनुसार १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज, ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असणे आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत त्याची परतफेड न झालेली असणे आवश्यक आहे. अशा पात्र शेतकऱ्यांना कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच, अल्पमुदत कर्जाचे पुनर्गठन (रिस्ट्रक्चरिंग) झालेल्या खात्यांनाही या योजनेचा लाभ लागू राहणार आहे.

दरम्यान, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या योजनेत कमाल ५० हजार रुपयांपर्यंतच अतिरिक्त लाभ मिळणार आहे. तसेच, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर शासनाच्या वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

689 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क