छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रसिद्ध ‘यल्ला यल्ला’ आणि ‘आईच्या गावात – फेमस टेन’ या रेस्टॉरंटमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला गंभीर खेळ अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) मध्यरात्रीच्या धडक कारवाईत उघड झाला. तपासणीत विविध खाद्यपदार्थांमध्ये सिंथेटिक फूड कलरचा वापर, बुरशी लागलेल्या भाज्या, अस्वच्छ स्वयंपाकघर, शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची एकत्र साठवणूक तसेच ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या अनेक गंभीर बाबी समोर आल्याने दोन्ही आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहेत.

मंगळवारी (ता. ३०) रात्री गजानन महाराज मंदिर रोड, विद्यानगर येथील ‘यल्ला यल्ला’ आणि कांचनवाडी, वीटखेडा येथील ‘आईच्या गावात – फेमस टेन’ रेस्टॉरंटची अचानक तपासणी करण्यात आली. या कारवाईत ‘यल्ला यल्ला’मध्ये बटर चिकन, पनीर, हरियाली कबाब, चिकन लॉलीपॉपसह विविध पदार्थांसाठी वापरण्यात येणारे सुमारे २० ते २५ डबे सिंथेटिक फूड कलर जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले. तसेच बुरशी लागलेल्या भाज्या, गंजलेली भांडी, अस्वच्छ किचन, कच्च्या अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याबाबत आवश्यक सूचना फलक नसल्याचेही आढळले.

‘आईच्या गावात – फेमस टेन’मध्ये बुरशी लागलेले कांदे, शिळ्या पालेभाज्या, फूड ग्रेड कंटेनरऐवजी प्लास्टिक ड्रममध्ये अन्नसाठा, मसाले व रंग उघड्यावर ठेवणे आणि कच्चा माल व कचरा एकाच ठिकाणी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. याशिवाय मेनूमध्ये ‘बटर नान’ व ‘बटर तंदुरी रोटी’ असा उल्लेख करून प्रत्यक्षात व्हेजिटेबल फॅट स्प्रेड (खुला डालडा) वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सहायक आयुक्त द. वि. पाटील, श्रीकांत करकळे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. रोडे व के. झाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वीच एफडीएने शहरातील अन्न व्यावसायिकांना नव्या अन्न सुरक्षा नियमांची माहिती देत कठोर कारवाईचा इशारा दिला होता. यापुढेही कोणतीही पूर्वसूचना न देता शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने आणि क्लाउड किचनवर अशाच धडक तपासण्या सुरू राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,061 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क