मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ अखेर यशस्वी झाल्याची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का देत पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला असून लोकसभा अध्यक्षांनी या गटाला मान्यता दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मंगळवारी रात्री घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींमध्ये उद्धवसेनेचे सहा खासदार दिल्लीला रवाना झाले. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन स्वतंत्र गट स्थापनेसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उद्धवसेनेचे एकूण नऊ खासदार निवडून आले होते. त्यापैकी परभणीचे संजय जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील आणि धाराशिवचे ओमराजे निंबाळकर या सहा खासदारांनी स्वतंत्र गटाची स्थापना केली आहे.
दरम्यान, या खासदारांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त १९ जून रोजी हे सर्व खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करू शकतात. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, या घडामोडींमुळे उद्धवसेनेत खळबळ उडाली आहे. पक्षासोबत राहिलेले खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाझे यांनी खासदार संजय राऊत यांच्यासह लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. फुटीर खासदारांच्या गटाला स्वतंत्र मान्यता देऊ नये, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मात्र, स्वतंत्र गटाला मान्यता मिळाल्याच्या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*