छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड आज (सोमवार, २० जुलै) होणार असून, महायुतीतील कोणत्या पक्षाच्या संचालकाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे अध्यक्षपद त्यांच्याच ताब्यात जाणे निश्चित मानले जात असले, तरी शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत रस्सीखेच चर्चेचा विषय ठरली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीने २० पैकी तब्बल १९ जागांवर विजय मिळवत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. संचालकांच्या संख्याबळात शिंदे सेनेचे वर्चस्व असल्याने अध्यक्षपदाच्या पहिल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी या पक्षाला संधी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. मात्र, भाजपकडूनही अध्यक्षपदावर दावा कायम ठेवण्यात आला असून, वरिष्ठ स्तरावर यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, शिंदे सेनेतही अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाने अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती मिळत असून, पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि त्यानंतर भाजपला संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

संचालकांच्या पक्षीय संख्याबळात शिंदे गटाचे ९, भाजपचे ६, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २, ठाकरे गट १, काँग्रेस १ आणि एक अपक्ष संचालक आहे. त्यामुळे बहुमताच्या जोरावर महायुती सहजपणे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडू शकते.

अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज सकाळी ११ वाजता नवनियुक्त संचालकांची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सर्व संचालकांमध्ये एकमत झाल्यास बिनविरोध निवड होईल; अन्यथा मतदानाद्वारे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड केली जाईल. त्यामुळे आजच्या बैठकीत जिल्हा बँकेच्या नेतृत्वाचा अंतिम फैसला होणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

639 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क