मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेल्या सहा खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी अधिकृत मंजुरी दिली आहे. या निर्णयाची माहिती लोकसभा सचिवालयाने जाहीर केली असून, त्यामुळे शिंदे गटाचे बहुचर्चित ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचे मानले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार निवडून आले होते. त्यापैकी दोन तृतीयांश म्हणजेच सहा खासदारांनी पक्षातून बाहेर पडत स्वतंत्र गट स्थापन केला होता. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची औपचारिक मान्यता मिळणे बाकी होते. अखेर ही प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित निर्णय लोकसभा सचिवालयाने जाहीर केला आहे.

दरम्यान, ठाकरे गटाने या सहा खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करत लोकसभा अध्यक्षांकडे आक्षेप नोंदवला होता. मात्र, अध्यक्षांनी तो आक्षेप फेटाळत विलीनीकरणाला मंजुरी दिली. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा आणखी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

निर्णयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना, “आम्ही तोडणारे नाही, जोडणारे आहोत. हे खासदार स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे, तर आपल्या मतदारसंघांच्या विकासासाठी आमच्यासोबत आले आहेत. त्यांच्या मतदारसंघांना विकासनिधी मिळेल आणि जनतेची कामे वेगाने पूर्ण होतील,” असे सांगितले.

पैसे घेऊन पक्षांतर केल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, “कोणीही आमच्याकडे आले की पैशांचे आरोप केले जातात. मात्र, जनतेसाठी काम करण्याची संधी मिळावी म्हणून अनेक लोक आमच्यासोबत येत आहेत. पक्षातून मोठ्या प्रमाणात लोक का बाहेर पडत आहेत, याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी करणे आवश्यक आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

480 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क