छत्रपती संभाजीनगर : शहरात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मोबाईलवर आलेली ‘एपीके’ फाईल अधिकृत असल्याचा समज करून ती उघडणे महावितरणच्या एका निवृत्त कनिष्ठ अभियंत्याला चांगलेच महागात पडले. फाईल उघडल्यानंतर काही क्षणांतच त्यांचा मोबाईल हॅक झाला आणि बँक खात्यातून तब्बल २४ लाख ७९ हजार ९८० रुपये सायबर भामट्यांनी परस्पर वळते केले.
या प्रकरणातील फिर्यादी दिगंबर वायकोस (वय ७०, रा. सिडको, एन-११) हे महावितरणमधून कनिष्ठ अभियंता पदावरून निवृत्त झाले आहेत. २५ जून रोजी मध्यरात्री त्यांच्या मोबाईलवर एका बँकेच्या नावाने ‘एपीके’ फाईल आली. ती अधिकृत संदेश असल्याचा समज करून त्यांनी फाईल उघडली. त्यानंतर काही सेकंदांतच त्यांच्या मोबाईलवर व्यवहाराचे सलग सहा संदेश आले. संदेश तपासल्यानंतर त्यांच्या खात्यातून लाखो रुपयांची रक्कम परस्पर वळती झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वायकोस यांनी तातडीने राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधून तक्रार नोंदवली. हेल्पलाईनकडून त्यांना त्वरित मोबाईलचे इंटरनेट बंद करण्याचा तसेच सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार अज्ञात सायबर भामट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर करीत आहेत.
सायबर गुन्हेगारांकडून बँका, वीज बिल, केवायसी अपडेट किंवा रिवॉर्ड पॉईंट्सच्या नावाखाली अशा ‘एपीके’ फाईल्स पाठवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. या फाईल्समध्ये घातक मालवेअर असल्याने त्या उघडताच मोबाईलवरील माहिती आणि बँक व्यवहारांवर हॅकर्सचा ताबा मिळू शकतो. त्यामुळे कोणतीही अनोळखी एपीके फाईल डाउनलोड किंवा उघडू नये, तसेच संशयास्पद संदेश आल्यास संबंधित संस्थेशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*