छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील बजाजनगर परिसरातील स्वामी समर्थ मंदिरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, चोरीनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर देखील सोबत घेऊन पलायन केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी मंदिरातील सुमारे दीड किलो वजनाच्या चांदीच्या चरण पादुका, स्वामी समर्थ महाराज यांचे सुमारे एक तोळे वजनाचे सोन्याचे लॉकेट तसेच दोन दानपेट्यांमधील अंदाजे दोन लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण ७ ते ८ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
ही घटना आज पहाटे उघडकीस आली. सकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास मंदिरातील सफाई कर्मचारी शरद पतंगे हे नियमित साफसफाईसाठी मंदिरात आले असता त्यांना मुख्य प्रवेशद्वाराचा कडी-कोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर त्यांनी तातडीने मंदिराचे सेवेकरी गजानन पाटील यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधून चोरीची माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी नितीन इनामे आणि हनुमान ठोके यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, मंदिरातील चोरीच्या या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून सकाळपासून अनेक भाविकांना मंदिराबाहेरूनच दर्शन घ्यावे लागत आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*