छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी ज्योतीनगर परिसरातील ७१ वर्षीय महिला समाजसेविकेची तब्बल ३३ लाख ६३ हजार ५४२ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात विशेष म्हणजे आरोपींनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना डॉ. सुधा चंद्रन यांचा बनावट आवाज आणि चेहरा असलेला डीपफेक व्हिडिओ तयार करून त्याचा वापर केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पूर्वी ब्युटी पार्लर व्यवसाय करत होत्या. १२ मार्च रोजी त्यांना सोशल मीडियावर शेअर मार्केट गुंतवणुकीसंदर्भातील एक व्हिडिओ जाहिरात दिसली. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री डॉ. सुधा चंद्रन या गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून मोठा नफा मिळवण्याचे आवाहन करत असल्याचे दिसत होते. आवाज आणि चेहरा हुबेहूब असल्यामुळे महिलेने जाहिरातीवर विश्वास ठेवून त्यातील लिंकवर क्लिक केले.
यानंतर स्वतःला गुंतवणूक सल्लागार सांगणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधून ‘क्वांटा इनोव्हेक्स’ या कंपनीत गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा आर्थिक फायदा मिळेल, असे सांगितले. सुरुवातीला केवळ २१ हजार रुपयांची गुंतवणूक करून त्यावर चांगला नफा झाल्याचे आभासी चित्र उभे करण्यात आले. त्यानंतर महिलेने सहा टप्प्यांमध्ये एकूण ३३ लाखांहून अधिक रक्कम आरोपींच्या खात्यात जमा केली.
गुंतवणुकीनंतर त्यांच्या ट्रेडिंग प्रोफाईलवर तब्बल ८२ लाख अमेरिकन डॉलर्सचा नफा दाखवण्यात आला. मात्र, ही रक्कम काढण्यासाठी ब्रिटिश सरकारचा कर भरावा लागेल, असे सांगून आरोपींनी आणखी पैशांची मागणी सुरू केली. संशय आल्याने महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी अवनी गुप्ता, रमण गुप्ता आणि विवान बिर्ला यांच्यासह सायबर टोळीविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*