छत्रपती संभाजीनगर : सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमोहर कॉलनी, एन-५ सिडको येथील नर्मदेश्वर मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणाचा गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. पोलिसांनी चोरीस गेलेली दानपेटी, त्यातील रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त केली आहे.
७ जुलै रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी नर्मदेश्वर मंदिरात प्रवेश करून मंदिरातील रोख रक्कम असलेली दानपेटी तसेच पितळी समई आणि पितळी नंदादीप चोरी करून नेले होते. या घटनेनंतर गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता.
तपासादरम्यान १३ जुलै रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अमजद खान सलीम खान (वय २८, रा. जलाल कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या साथीदार नईम उर्फ चुन्नू उस्मान शहा (रा. कच्ची घाटी) आणि इमरान खान युनूस खान (रा. कटकट गेट) यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपीच्या सांगण्यावरून चोरीची दानपेटी कच्ची घाटी येथील तलावातून हस्तगत करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली बजाज डिस्कव्हर मोटारसायकलही जप्त करण्यात आली. ही मोटारसायकल देखील चोरीची असल्याचे तपासात समोर आले असून तिच्याबाबत हर्सूल पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल आहे.
अटक आरोपी अमजद खान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव आणि सहायक पोलीस आयुक्त मजहर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*