छत्रपती संभाजीनगर : शहरातील सुरक्षित आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या मुक्कामासाठी ओळखल्या जाणाऱ्या शासकीय सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेस्ट हाऊसच्या व्हीआयपी सूटमध्ये राहण्यासाठी आलेल्या एका आयएएस अधिकाऱ्याच्या नातेवाइकांचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत कारवाई करत कंत्राटी व्यवस्थापकाला अटक केली आहे.
कपिल देशमुख (वय ३०, मूळ रा. हिंगोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संबंधित आयएएस अधिकाऱ्यांचे नातेवाईक ११ जुलै रोजी शहरातील एका कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था सुभेदारी गेस्ट हाऊसच्या न्यू देवगिरी सूटमध्ये करण्यात आली होती. कार्यक्रम आटोपून ते रात्री उशिरा आपल्या खोलीवर परतले.
दरम्यान, १२ जुलै रोजी दुपारी खोली रिकामी करताना त्यांच्या बॅगमधील सामान अस्ताव्यस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तपासणी केली असता बॅगेत ठेवलेले १४ हजार २५० रुपये रोख आणि अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी त्यांच्यासाठी नियुक्त करण्यात आलेले खासगी चालक मोहम्मद जुबैदुल्लाह यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कपिल देशमुख याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये वरिष्ठ शासकीय अधिकारी, मंत्री, लोकप्रतिनिधी आणि इतर व्हीआयपी व्यक्तींचा नियमित मुक्काम असतो. अशा संवेदनशील आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याकडूनच चोरीची घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*