छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रसिद्ध हनुमान टेकडी परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक प्रकाराने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. फिरण्यासाठी आलेल्या दोन उच्चशिक्षित तरुणींची मद्यधुंद तरुणांच्या टोळक्याने छेड काढल्याची घटना घडली. या प्रकाराला विरोध करणाऱ्या त्यांच्या मित्रावर आरोपींनी बिअरच्या बाटलीने हल्ला करून जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, आरोपींच्या नातेवाईकांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गोंधळ घालत महिला पोलिस कर्मचाऱ्यांशीही धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता दोन तरुणी हनुमान टेकडी परिसरात फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना त्यांचा एक मित्र भेटला. दरम्यान, परिसरातील एका बिअर शॉपीसमोर उभ्या असलेल्या चार मद्यपी तरुणांनी तरुणींवर अश्लील कमेंट करत छेडछाड सुरू केली. हा प्रकार पाहून तरुणींसोबत असलेल्या मित्राने संबंधितांना जाब विचारला. मात्र, संतापलेल्या आरोपींनी त्याच्यावर बिअरच्या बाटलीने हल्ला करून त्याच्या डोक्यात गंभीर मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच गस्तीवरील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चारही आरोपींना ताब्यात घेऊन बेगमपुरा पोलिस ठाण्यात आणले. मात्र, रात्री सुमारे १० वाजता आरोपींचे नातेवाईक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पोलिसांशी वाद घालत गोंधळ घातला आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या गोंधळादरम्यान एका महिला पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी सूरज सतीश साळवे (२०), आकाश राजू म्हस्के (२३), ऋषिकेश रतन नवगिरे (२१) आणि आदर्श ईश्वर वाकेकर (२०) यांच्याविरुद्ध विनयभंग, मारहाण तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून शहरातील सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*