छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरातील गजानननगर येथे मध्यरात्री अवघ्या २० मिनिटांत घरफोडीची धक्कादायक घटना घडली. पत्नीला आणण्यासाठी घराबाहेर गेलेल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि क्रेडिट कार्ड लंपास केले. चोरी करून पळणाऱ्या दोन चोरट्यांपैकी एकाला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याने झटका देत पळ काढला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश सुरेश सदावर्ते (वय ३८) हे खुलताबाद येथील कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांची पत्नी बाहेरगावी गेली होती. शनिवारी मध्यरात्री पत्नीने फोन करून शिवाजीनगर रोडवरील जानकी हॉटेलजवळ आल्याचे सांगितल्याने सदावर्ते यांनी घराला कुलूप लावून दुचाकीवरून पत्नीला आणण्यासाठी प्रस्थान केले. त्यांची दोन लहान मुले घराच्या पहिल्या मजल्यावर झोपलेली होती.

सुमारे २० मिनिटांनी ते पत्नीसह घरी परतले असता घराचा दरवाजा उघडा दिसला. संशय आल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी घरातून दोन चोरटे बाहेर धावत आले. त्यापैकी एका संशयिताला त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो झटका देऊन साथीदारासह पसार झाला.

घराची पाहणी केली असता किचनमधील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील एक तोळ्याचे मिनीगठण, पाच ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातल्या रिंगा आणि एक हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी घरातील क्रेडिट कार्डही चोरून त्याद्वारे दोन वाईन शॉपवर खरेदीचा प्रयत्न केला. एका ठिकाणी व्यवहार यशस्वी झाल्याची, तर दुसऱ्या ठिकाणी तो अयशस्वी ठरल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंढे, सहायक निरीक्षक शिवप्रसाद कहऱ्हाळे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. हेड कॉन्स्टेबल ससाणे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध वेगाने सुरू आहे. शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

853 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क