छत्रपती संभाजीनगर : जिल्हा ग्रामीण पोलिसांनी नागरिकांच्या विश्वासाला सार्थ ठरवत तब्बल 130 हरवलेले आणि गहाळ झालेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या हाती सुपूर्द केले. सुमारे 22 लाख 73 हजार 972 रुपयांच्या या मोबाईलमध्ये ॲपल, ओप्पो, विवो, सॅमसंग, रियलमी, रेडमीसह विविध कंपन्यांच्या मोबाईलचा समावेश होता.
कैलासशिल्प सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या “विश्वासाची परतफेड” या विशेष कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते नागरिकांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा केवळ संवादाचे साधन नसून त्यामध्ये कुटुंबीयांचे फोटो, आठवणी, बँकिंग व्यवहार, महत्त्वाची कागदपत्रे आणि आयुष्याशी जोडलेल्या अनेक गोष्टी साठवलेल्या असतात. त्यामुळे मोबाईल हरवणे म्हणजे केवळ आर्थिक नुकसान नसून भावनिक धक्का देखील असतो.
हरवलेला मोबाईल पुन्हा हातात घेताना अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. काहींनी मोबाईल परत मिळण्याची आशाच सोडली होती. मात्र ग्रामीण पोलिसांच्या तांत्रिक तपास, IMEI ट्रॅकिंग, CEIR प्रणाली आणि विविध जिल्ह्यांतील पोलिसांशी केलेल्या समन्वयामुळे हे शक्य झाले.
मोबाईलमध्ये जपलेल्या आठवणी आणि महत्त्वाची माहिती पुन्हा मिळाल्याने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. अनेक नागरिकांनी ग्रामीण पोलिसांचे मनापासून आभार मानत, “ही केवळ मोबाईल परत मिळाल्याची घटना नसून पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणारा अनुभव आहे,” अशी भावना व्यक्त केली.
यावेळी पोलिसांनी नागरिकांना मोबाईल हरवल्यास तात्काळ तक्रार नोंदवून CEIR पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*