नवी दिल्ली : देशातील शिक्षण क्षेत्रात मोठी राजकीय घडामोड घडली असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्त केला असून त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत या निर्णयाची माहिती दिली. जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याने राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, गेली चार दशके ते विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणांसाठी कार्यरत आहेत. देशाच्या प्रगतीसाठी सक्षम, पारदर्शक आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था आवश्यक असल्याचा त्यांचा कायम विश्वास राहिला आहे.
नीट-यूजी २०२६ परीक्षेतील कथित अनियमिततेच्या तक्रारी समोर आल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने तपासाचे आदेश दिले. प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला तसेच परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. भविष्यात नीट परीक्षा पूर्णपणे संगणक-आधारित (CBT) पद्धतीने घेण्याची घोषणाही करण्यात आली.
प्रधान यांनी सांगितले की, २१ जून २०२६ रोजी २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा यशस्वीरित्या पार पडली आणि १६ जुलै रोजी निकालही जाहीर करण्यात आला. मात्र, काही घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
आपल्या राजीनाम्यामागील भूमिका स्पष्ट करताना त्यांनी म्हटले की, हा निर्णय वैयक्तिक प्रतिष्ठेचा नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून घेतला आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भविष्य कायदेशीर व राजकीय वादात अडकू नये, या उद्देशाने आपण पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हा मोठा टप्पा मानला जात आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*