छत्रपती संभाजीनगर : शहरातील केंब्रिज चौक येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब कमानीच्या उभारणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. एसआर राजपूत कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. यांच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात येणार असून, कामादरम्यान नागरिकांची सुरक्षितता आणि संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केंब्रिज चौक परिसरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
मंगळवार, दि. ८ सप्टेंबर आणि बुधवार, दि. ९ सप्टेंबर या दोन दिवसांच्या रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत सिडको वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे यांनी अधिसूचना जारी केली आहे.
जालनाकडून शहराकडे येणारी वाहतूक : केंब्रिज चौक ते चिकलठाणा बाजारतळ हा मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे. वाहनचालकांनी केंब्रिज चौकातून डावीकडे वळून झाल्टा फाटा, जुना बीड नाका, शनी आश्रम रोडमार्गे पुन्हा जालना रोड, देवळाई किंवा शाहनूर मियाँ दर्गा रोडचा वापर करावा. शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांसाठी झाल्टा फाटा येथून उजवीकडे वळून महानुभाव आश्रम चौक ते संग्रामनगर उड्डाणपुलाचा मार्ग उपलब्ध राहणार आहे.
शहरातून जालनाकडे जाणारी वाहतूक : चिकलठाणा बाजारतळ (शनी आश्रम कट) ते जालना रोड हा मार्ग बंद राहील. वाहनांना चिकलठाणा बाजारतळावरून जुना बीड नाक्यापर्यंत जाऊन उजवीकडे वळावे लागेल. त्यानंतर बीड बायपास रोडने डावीकडे वळून पुढे जालना रोडकडे जाता येईल.
वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*