छत्रपती संभाजीनगर : लग्नाच्या मागणीला तरुणीच्या वडिलांनी नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने तब्बल १५ हून अधिक बनावट इन्स्टाग्राम खाती तयार करून तरुणीची व तिच्या कुटुंबाची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने तरुणीच्या नातेवाइकांना टॅग करून अश्लील व शिवराळ भाषेत संदेशही पाठवले. मार्च ते ऑगस्टदरम्यान हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात आयटी अॅक्टसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित अंकुश चव्हाण (३५, रा. मंगळवार पेठ, कराड, जि. सातारा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि रोहित हे दोन वर्षांपूर्वी पुण्यातील एका कंपनीत एकत्र काम करत होते. त्यावेळी त्यांची ओळख झाली होती. नंतर रोहितला कंपनीतून काढून टाकण्यात आले.
१४ फेब्रुवारी २०२६ रोजी रोहितने तरुणीकडे लग्नाची मागणी घातली. तरुणीने ही बाब आई-वडिलांना सांगितल्यानंतर २२ मार्च रोजी तिचे आई-वडील पुण्यातील सीझन्स मॉल येथे रोहितला भेटले. मात्र, त्याचे वर्तन आणि बोलण्याची पद्धत न आवडल्याने त्यांनी लग्नास स्पष्ट नकार दिला.
नकार मिळाल्यानंतर रोहितने तरुणीचा सोशल मीडियावरून मानसिक छळ सुरू केल्याचा आरोप आहे. त्याने वेगवेगळ्या नावांनी १५ हून अधिक बनावट इन्स्टाग्राम खाती तयार करून तरुणीच्या मूळ खात्यावर आक्षेपार्ह संदेश पाठवले. तसेच तिच्या सोशल मीडिया पोस्टवर बदनामीकारक कमेंट्स केल्या. तिच्या नातेवाइकांना टॅग करून वडिलांबाबतही अश्लील आणि शिवराळ संदेश पाठविल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सायबर पोलिसांनी लावला छडा
सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने १० ऑगस्ट रोजी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. तांत्रिक तपासात सर्व बनावट खाती रोहित चव्हाणच चालवत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र सांगळे करीत आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*