छत्रपती संभाजीनगर : एशियन हॉस्पिटलच्या एनआयसीयूमध्ये लागलेल्या आगीतून सुखरूप बाहेर काढल्यानंतर घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या जुळ्या बाळांचा रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला. आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर दोन्ही चिमुकल्यांचे चेहरे आणि मनात एकच प्रार्थना होती—‘दोघांना वाचवा…’ डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न केले; मात्र अखेर काळाने या कुटुंबाचा आनंद हिरावून घेतला.
एशियन हॉस्पिटलच्या एनआयसीयूमध्ये शुक्रवारी पहाटे आग लागल्यानंतर परिचारिका आणि निवासी डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत अवघ्या सहा मिनिटांत नऊ शिशूंना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर या शिशूंना घाटी रुग्णालयासह शहरातील अन्य खासगी रुग्णालयांत हलविण्यात आले. घाटीत दाखल झालेल्या पाच शिशूंमध्ये या जुळ्या बाळांचा समावेश होता.
या दोन्ही बाळांचा जन्म अवघ्या २७ आठवड्यांच्या गर्भावस्थेत झाला होता. जन्मावेळी त्यांचे वजन अत्यंत कमी होते आणि फुफ्फुसांचा पूर्ण विकास झालेला नव्हता. त्यामुळे जन्मापासूनच त्यांच्यावर एनआयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आगीच्या घटनेनंतर शुक्रवारी पहाटे त्यांना घाटीतील बालरोग विभागात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी पहाटे ३ वाजता एका बाळाने, तर सकाळी ७ वाजता दुसऱ्या बाळाने अखेरचा श्वास घेतला.
एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ. शोएब हाश्मी यांनी जन्मावेळी कमी वजन, अपूर्ण विकसित फुफ्फुसे आणि अकाली जन्मामुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या समस्यांमुळे बाळांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
कन्नड येथील वडील मुजाहिद कुरेशी यांनी या दुःखद प्रसंगातही डॉक्टरांवर कोणताही आरोप केला नाही. ‘अल्लाहची अनामत होती, अल्लाहनेच परत घेतली,’ असे म्हणताना त्यांचा कंठ दाटून आला. डॉक्टरांनी बाळांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन चिमुकल्यांच्या आगमनाने ज्या घरात आनंदाचे दोन पाळणे हलणार होते, त्याच घरात आता त्यांच्या आठवणींचा हुंदका आणि डोळ्यांत अश्रू उरले आहेत.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*