छत्रपती संभाजीनगर : यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. गणेश मंडळांना परवानग्या मिळवताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, तसेच वाहतूक, वीजपुरवठा आणि नागरी सुविधांचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी दिले.
सार्वजनिक गणेशोत्सव-२०२६ च्या पूर्वतयारीसंदर्भात एमआयटी युनिव्हर्सिटी कॅम्पस, बीड बायपास रोड येथील मंथन हॉलमध्ये पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय बैठक झाली. यावेळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी खासदार चंद्रकांत खैरे, उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पना पिंपळे, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गर्दीचे व्यवस्थापन, मिरवणूक मार्ग आणि विसर्जनस्थळी सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला.
उत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसांत नियमानुसार रात्री १२ वाजेपर्यंत ढोल पथके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी राहणार आहे. मात्र, ध्वनिप्रदूषणाचे नियम आणि कायदा-सुव्यवस्था यांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले.
गणेश मंडळांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक उपक्रमांवर भर द्यावा, असे आवाहनही करण्यात आले. महापालिकेकडून स्वच्छता, रस्ते आणि विसर्जनस्थळांची तयारी, तर महावितरणकडून सुरक्षित वीजपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*