छत्रपती संभाजीनगर : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ६१ नवीन वातानुकूलित ई-बस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याची तयारी पूर्ण केली आहे. या बससेवेचे लोकार्पण १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिद्धार्थ उद्यान परिसरात होणार आहे. हैदराबाद येथील ओलेक्ट्रा कंपनीकडून मिळालेल्या ३४ आणि केंद्र सरकारच्या ‘पीएम ई-बस’ योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या २७ अशा एकूण ६१ बस शहराच्या रस्त्यावर धावणार आहेत.
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून २०१८ मध्ये शहरात १०० डिझेल बस सुरू करण्यात आल्या होत्या. या बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, दररोज सुमारे १५ ते १८ हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. मात्र, १०० पैकी सुमारे २५ बस खराब झाल्याने उपलब्ध बसची संख्या कमी झाली आहे.
दरम्यान, स्मार्ट सिटीने ओलेक्ट्रा कंपनीकडून ३५ बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कंपनीकडून सुरुवातीला केवळ एकच बस उपलब्ध करून देण्यात आली. उर्वरित ३४ बस मिळवण्यासाठी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी कंपनीला नोटीस बजावत अनामत रक्कम जप्त करण्याचा इशारा दिला. त्यानंतर गत आठवड्यात कंपनीने उर्वरित ३४ बस महापालिकेकडे सुपूर्द केल्या.
केंद्र सरकारच्या ‘पीएम ई-बस’ योजनेतून महापालिकेला एकूण १०० वातानुकूलित बस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी २७ बस नुकत्याच प्राप्त झाल्या असून, उर्वरित बस पुढील दोन महिन्यांत मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जुन्या ७५ डिझेल बस आणि नवीन ६१ ई-बस अशा एकूण १३६ बस शहराच्या रस्त्यावर धावण्याची शक्यता आहे. यातील दोन बस पर्यटनस्थळांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान, ओलेक्ट्राच्या ३५ बससाठी जाधववाडी येथील चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. पीएम ई-बससाठी स्वतंत्र चार्जिंग स्टेशनला आणखी १५ दिवस लागणार असले, तरी सध्या उपलब्ध चार्जिंग स्टेशनचा वापर करून बससेवा सुरू करता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*