छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या संदीप शिरसाट व त्याच्या साथीदारांनी बांधकाम व्यावसायिक शरद राठोड आणि त्यांच्या सहकाऱ्याला बेदम मारहाण करत अपहरण केल्याची धक्कादायक घटना रविवारी (६ एप्रिल) पहाटे सातारा परिसरातील सुधाकरनगर भागात घडली. या प्रकरणात शिरसाट यासह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी संदीप शिरसाटला पोलिसांनी अटक केली आहे.
राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या अभिजित ऊर्फ बंटी बर्डे या सहकाऱ्याची पूर्वी शिरसाटशी ओळख होती. अभिजित शिरसाटकडे शासकीय टेंडरच्या कामात सहाय्यक म्हणून काम करत होता, मात्र त्रासामुळे तो राठोड यांच्या कार्यालयात रुजू झाला होता. ही बाब शिरसाटला मान्य नसल्याने तो वैतागला होता.
घटनेच्या दिवशी राठोड हे हॉटेलवरून जेवण करून बाहेर पडत असताना शिरसाट, त्याचा पोलीस कर्मचारी भाऊ मिथुन शिरसाट, स्वप्निल गायकवाड, हर्षल, निखिलेश कांबळे आणि इतरांनी त्यांना ‘ऑफिसचे काम आहे’ असे सांगत गाडीत बसवून सुधाकरनगरमधील एका कार्यालयात नेले. तेथे त्यांना अर्धनग्न करून केबल, लोखंडी रॉड, पट्टे आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली. तसेच, संदीपने पिस्तूल डोक्याला लावून ‘तुला मारून डोंगरात फेकून देतो’ अशी धमकी दिली.
यानंतर संदीपने राठोड यांना अभिजितला फोन करून “दुचाकीचं पेट्रोल संपलं” असे सांगण्यास भाग पाडले. अभिजित पेट्रोल घेऊन आल्यानंतर त्यालाही जबरदस्तीने आलिशान गाडीत बसवून त्याचा लॅपटॉप काढून घेतला आणि कपडे उतरवून अमानुष मारहाण केली.
दोघांना काही वेळ डांबून ठेवून, शेवटी देवळाई चौकात सोडण्यात आले. राठोड हे घरी गेले असता, त्यांचे वडील जे सेवानिवृत्त पोलीस आहेत, त्यांनी थेट पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेतली. त्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पुढील तपासासाठी ती सातारा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.
मिथुन शिरसाट हा पोलीस कर्मचारी असून २०२२ पासून तो कामावर गैरहजर होता. आता गंभीर गुन्ह्यात सहभाग आल्याने त्याच्यावर कडक कारवाई होणार असल्याचे उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी सांगितले.
संदीप शिरसाट याने २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती व दुसऱ्या क्रमांकावर होता. २०२४ मध्येही तो संभाजीराजे छत्रपती यांच्या पक्षातून निवडणूक लढवण्यासाठी समोर आला होता.
ही घटना सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची आठवण करून देणारी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा गुंडगिरीचा थरकाप उडाला असून, या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IBQjYargTnVERr4Mfn8oZR
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*