छत्रपती संभाजीनगर : एप्रिल–मे महिन्यात जाणवणारा उन्हाचा कडाका यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत असून दररोज नव्या उच्चांकाची नोंद होत आहे. रविवारी शहरात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागला. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील अनेक रस्ते अक्षरशः निर्मनुष्य दिसत होते.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार १ मार्चपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. १ मार्च रोजी कमाल तापमान ३४.५ अंश होते. त्यानंतर २ मार्चला ३५ अंश, ३ मार्चला ३६.२ अंश, तर ४ मार्चला ३६.८ अंश तापमान नोंदविले गेले. ५ मार्चला ३६.६ अंशांवर असलेले तापमान ६ मार्चला वाढून ३७.६ अंशांवर पोहोचले. त्यानंतर ७ मार्च रोजी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ३८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ८ मार्चलाही तापमान ३८ अंशांच्या आसपास राहिले. किमान तापमान देखील १९ ते २१ अंशांच्या दरम्यान नोंदविले जात आहे.

तापमानात झालेल्या या वाढीचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही दिसून येत आहे. दुपारच्या कडक उन्हामुळे अनेक नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. विशेषतः दुपारच्या वेळेत बाजारपेठा आणि रस्ते ओस पडलेले दिसत आहेत.

दर रविवारी जाफरगेट परिसरात भरला जाणारा आठवडी बाजार हा नेहमीच मोठ्या गर्दीचा असतो. मात्र रविवारी कडक उन्हाच्या तडाख्यामुळे बाजारात अपेक्षित गर्दी दिसली नाही. भाजीपाला, फळे, कपडे तसेच घरगुती वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांनी ग्राहकांची संख्या निम्म्यावर आल्याचे सांगितले. सकाळच्या वेळेत थोडीफार विक्री झाली असली तरी दुपारनंतर ग्राहकांची वर्दळ जवळपास थांबली.

जाफरगेट परिसरात भरला जाणारा सेकंड हँड इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा बाजारही यावेळी शांतच दिसून आला. गरिबांचा निराला बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या बाजारात अनेक विक्रेते उन्हामुळे आलेच नाहीत, तर काहींनी ग्राहक नसल्याने आपला माल परत नेल्याची माहिती विक्रेते इम्रान खान यांनी दिली.

दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे शीतपेयांच्या विक्रीत मात्र वाढ झाली आहे. आठवडी बाजारात १० रुपयांत मिळणाऱ्या सरबताला ग्राहकांनी मोठी पसंती दिली. अनेक ग्राहकांनी एकाऐवजी दोन ते तीन ग्लास सरबत घेतल्याचे चित्र दिसून आले.

हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांच्या मते, यंदाच्या उन्हाळ्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. अतिनील किरणांची तीव्रता वाढल्यामुळे सध्या उकाडा अधिक जाणवत असून पुढील काही दिवसांतही उष्णतेचा तडाखा कायम राहण्याची शक्यता आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

659 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क