छत्रपती संभाजीनगर : प्लॉट विक्रीचे आमिष दाखवून सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाची तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे.

एकतानगर परिसरात राहणारे गोरख मानसिंग चव्हाण (६०) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. चव्हाण हे पोलिस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले असून सध्या जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, २०२३ मध्ये त्यांची ओळख यासीन खान याच्या माध्यमातून शेख इरफान याच्याशी झाली. इरफान हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो, असे सांगून त्याने हिमायतबाग परिसरातील चाऊस कॉलनी येथे गट क्रमांक १९/१ मधील १८.७ आर जमीन विक्रीस असल्याचे सांगितले. ही जमीन शेख जमील यांच्या नावावर असल्याचे सांगून इरफान आणि त्याच्या कुटुंबीयांनी चव्हाण यांचा विश्वास संपादन केला.

यानंतर आरोपींनी सातारा परिसरातील रो-हाऊस विक्रीचा तात्पुरता करार केला. मात्र या व्यवहारातील सहमालकाने इरफानने कोणतीही रक्कम दिलेली नसल्याचे स्पष्ट केल्याने संशय निर्माण झाला आणि फसवणुकीचा प्रकार समोर आला. या प्रकरणात शेख इरफान शेख शफीक, शेख सलमान शेख शफीक, गौसिया बेगम शेख शफीक, शेख शफीक उर्फ शेख साहब (सर्व रा. सलमान हॉल, दिल्ली गेट), शेख जमील शेख गुलाम रसुल (रा. ईदगाह झोपडपट्टी, रोजेबाग) आणि शेख इम्रान शेख गफ्फार (रा. कैसर कॉलनी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, हा व्यवहार एकूण २ कोटी रुपयांत ठरला होता. त्यानुसार चव्हाण यांनी २० लाख रुपये आरटीजीएसद्वारे दिले, तर त्यांचे मित्र यासीन खान यांनी विविध तारखांना रोख रक्कम दिली. १५ ते २० फेब्रुवारी २०२४ दरम्यान आरोपी इरफान याला एकूण १ कोटी ३३ लाख रुपये देण्यात आले. ही रक्कम मिळाल्याची नोंद त्याने स्वतःच्या हस्ताक्षरात रजिस्टरवर करून दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

मोठी रक्कम घेतल्यानंतर आरोपींनी जमीन नोंदणीकृत करून देण्यास टाळाटाळ सुरू केली. पैसे परत मागितल्यावर आरोपींनी हिमायतनगर परिसरातील प्लॉट क्रमांक ८३ ते ८६ देण्याचे आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्ष खरेदीखत न करता केवळ नोंदणीकृत मुखत्यारनामा (जीपीए) करून दिला. त्या प्लॉटचा ताबाही देण्यात आला नाही.

याचदरम्यान दिल्ली गेट येथील सलमान हॉलमधील दोन दुकाने विक्री करण्याचा करार करण्यात आला. मात्र दुकानाचा ताबा घेण्यासाठी चव्हाण आणि त्यांचे भागीदार गेले असता शेख शफीक उर्फ शेख साहब याने बंदूक दाखवत पुन्हा येथे आलात तर गोळी मारेन, अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, जुलै २०२४ मध्ये आरोपींनी समजुतीचा करार करून ४० लाख रुपयांचे तीन धनादेश दिले होते. मात्र हे धनादेश बँकेत वटले नाहीत. त्यानंतर दिलेले इतर धनादेशही खाते बंद असल्याने परत आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

937 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क