छत्रपती संभाजीनगर :  जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी दोन स्वतंत्र कारवाया करत लाचखोर अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई केली. वैजापूर येथे उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला ऑनलाइन ‘फोन पे’द्वारे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले, तर सोयगाव तालुक्यातील किन्ही येथे पोलिस पाटलाच्या सांगण्यावरून लाच स्वीकारणाऱ्या त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपी पोलिस पाटील फरार झाला आहे.

वैजापूर येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी निखिल अशोक कवाडे (वय ३३) याने भाडेतत्त्वावर घेतलेल्या बोलेरो जीपचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराची टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी असून त्यांनी आपली गाडी जलसंधारण विभागाला भाड्याने दिली होती. या गाडीचे एम.बी. बुक, लॉग बुक आणि काँटीजेन्सी बिलावर सही करून ते मुख्य कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यासाठी कवाडे याने वारंवार लाचेची मागणी केली होती.

याप्रकरणी तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता कवाडे याने ७ हजार रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली. शनिवारी दुपारी ‘फोन पे’द्वारे रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने वैजापूर येथील शिवूर रोड परिसरातील अयोध्या नगर भागातून कवाडे याला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याच्या निवासस्थानी उशिरापर्यंत झडती सुरू होती.

दरम्यान, दुसरी कारवाई सोयगाव तालुक्यातील किन्ही येथे करण्यात आली. गावातील एका व्यक्तीचे एका महिलेसोबत भांडण झाले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिस पाटील मन्साराम लोखंडे याने ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ३ हजार रुपये देण्याचे ठरले. एसीबीने हॉटेलमध्ये सापळा रचला असता लोखंडे याने ही रक्कम संतोष शेळके याच्याकडे देण्यास सांगितले. पथकाने शेळके याला ३ हजार ६०० रुपयांसह ताब्यात घेतले. कारवाईची चाहूल लागताच पोलिस पाटील लोखंडे फरार झाला. एसीबीचे निरीक्षक केशव दिंडे यांच्या फिर्यादीवरून सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

536 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क