छत्रपती संभाजीनगर : होळी व धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील उच्चभ्रू तरुणाईला लक्ष्य करत आणण्यात आलेली तब्बल ९० लाख ५९ हजार रुपयांची एमडी (मेफेड्रोन) पावडर गुन्हे शाखेने जप्त केली आहे. या कारवाईत ५०३ ग्रॅम ड्रग्जसह एकूण ९६ लाख २३ हजार १० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
गुन्हे शाखेचे पीएसआय संदीप काळे यांना मध्य प्रदेश पासिंगच्या लाल रंगाच्या कारमधून मोठी ड्रग्ज खेप शहरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पडेगाव येथील आर्च आंगण अपार्टमेंटसमोर सापळा रचण्यात आला. दुपारी पावणेदोनच्या सुमारास संशयित कार आणि दुचाकीवरून आलेल्या टोळीला पोलिसांनी घेराव घालत झडती घेतली. त्यावेळी ५०३ ग्रॅम एमडी पावडर, कार, सात मोबाईल, २१ हजार रुपये रोख, दोन चाकू आणि वजनकाटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, या टोळीने शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्जचे जाळे पोहोचवले होते. काही विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपवर ड्रग्जचे व्हिडिओ पाठवून व्यवहार केले जात होते. पोलिसांनी १५ ते २० संशयित हस्तकांची यादी तयार केली असून त्यांच्यावर लक्ष ठेवले आहे.
या रॅकेटचा मुख्य सूत्रधार हर्ष ओमप्रकाश शर्मा हा इंदूर येथील बीएचएमएसचा विद्यार्थी असून एका उद्योजकाचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. त्याने आर्थिक मदत पुरविल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने शिर्डीला दर्शनासाठी आलो असल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईल चॅट्स व आर्थिक व्यवहारांच्या आधारे त्याचा भांडाफोड झाला. पुढील तपास सुरू आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*