छत्रपती संभाजीनगर : बनावट नोटा तयार करून देण्याचे आमिष दाखवत हातचलाखीने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलीस ठाणेच्या पथकाने शुक्रवारी पहाडसिंगपुरा भागातून अटक केली. शेख फेरोज शेख रफिक (३१) आणि शेख वसीम शेख ताहेर (२९, दोघे रा. बिलोली, जि. नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिस हवालदार दीपक मालकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, इनोव्हा कार (टीएस ०७ जेडब्ल्यू ०६६६) मधून दोघे जण पहाडसिंगपुरा परिसरात बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक मारोती मदेवाड यांच्या पथकाने दुपारी सुमारे २.३० वाजता न्यू पहाडसिंगपुरा येथील मुख्य रस्त्यावर सापळा रचला. संशयित वाहन अडवून तपासणी केली असता फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

आरोपींच्या कारची झडती घेतली असता ५०० रुपयांच्या नोटांच्या आकाराचे पांढऱ्या कागदांचे बंडल, बटणे, प्लग, लाईट आणि व्होल्टेज मीटर लावून मशीनसारखे रूप दिलेला दोन बाय अडीच फुटांचा प्लायवूडचा चौकोनी बॉक्स, आयोडीन द्रव्याची प्लास्टिकची बाटली, इलेक्ट्रिक तारा आणि पांढरी पावडर असा एकूण १,१५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी आधी खऱ्या ५०० रुपयांच्या नोटेला आयोडीन लावून ती काळी करत. त्यानंतर ती नोट प्लेटमध्ये ठेवून बनावट मशीन सुरू करून पावडरने धुतल्याचा आभास निर्माण करत. आयोडीन निघून नोट पूर्ववत झाल्याने समोरच्यांचा विश्वास बसत असे. त्यानंतर एका लाखाच्या बदल्यात चार लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवत पांढऱ्या कागदांचे बंडल देऊन आरोपी पसार होत असत.

यापूर्वी ८ फेब्रुवारी रोजी मालेगाव पोलीस यांनी अशाच प्रकारातील एका प्रकरणात कारवाई केली होती. मागील वर्षी वाळूज परिसरातील बंगल्यात सुरू असलेला बनावट नोटांचा कारखानाही पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

532 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क