छत्रपती संभाजीनगर : करमाड परिसरातील शेकटा भागात ७५ वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेचा उलगडा करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. दारकुबा बालाजी भावले (४६, रा. लाडसावंगी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, मेंढ्या चारण्याच्या वादातूनच हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
शनिवारी (२१ फेब्रुवारी) शेतात सुंदराबाई जाधव या रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या डोक्यात मोठा दगड मारून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान घटनेच्या दिवशी त्या परिसरात मेंढ्या चारण्यासाठी आलेला दारकुबा भावले संशयाच्या भोवऱ्यात सापडला.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंग राजपूत व करमाडचे निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. चौकशीत समोर आले की, भावले हा नेहमी सुंदराबाई यांच्या शेताजवळ मेंढ्या चारत असे. मात्र त्या त्याला वारंवार हटकत असल्याने दोघांत वाद होत असत. घटनेच्या दिवशीही त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर झाडाखाली विश्रांती घेत असलेल्या सुंदराबाई यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याने हत्या केली.
गुन्ह्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी दोन दिवस कामावर गैरहजर राहिला व भाचीच्या लग्नासाठी बाहेरगावी गेल्याचे खोटे सांगितले. संशय वाढल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांच्या मदतीने गोलटगाव येथून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याला न्यायालयात हजर करून कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IdBhTvB8DI79n97XfExNI9?mode=gi_t
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*