अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्ष सुभाष झांबड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एम. जामदार यांनी फेटाळला आहे. बँकेतील ठेवीदारांच्या सुमारे ९७.४१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात झांबड हे मुख्य आरोपी आहेत. या प्रकरणात वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु अद्याप झांबड यांना अटक झालेली नाही.
या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. बँकेचे सीईओ प्रदीप कुलकर्णी यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जही जिल्हा न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, अध्यक्ष झांबड यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु अखेर न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला.
या प्रकरणात ठेवीदार मंगेश कपोते आणि इतरांनी ॲड. विकास सुरेश तानवडे यांच्यामार्फत न्यायालयात बाजू मांडली, तर आरोपींच्या वतीने ॲड. एस. जी. लड्डा यांनी काम पाहिले. सरकारतर्फे एन. बी. धोंगडे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
काय आहे प्रकरण?
१८ ऑक्टोबर २०२३ रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात विशेष लेखा परीक्षकांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावरून अजिंठा बँकेच्या अध्यक्ष सुभाष झांबड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुलकर्णी, खासगी लेखापरीक्षक सतीश मोहरे आणि बँकेच्या २००६ ते २०२३ या कालावधीतील सर्व संचालकांविरुद्ध अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवला होता. आरोपांनुसार, बँकेच्या ३६ लोकांच्या बनावट ठेवी आणि बोगस कर्ज वाटपाचा समावेश आहे, ज्यामुळे ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/E3cu6nJZUyE6deFZQWJ9le
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*