मराठवाड्याच्या विकासासाठी भुमीपुत्र जन पार्टीने महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आज औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव भोळे यांनी हा निर्णय जाहीर केला.
मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मागण्या:
पक्षाने मराठवाड्याच्या प्रलंबित विकासकामांसाठी पुढील तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
1. 371(2) ब कलमाची अंमलबजावणी: मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी संविधानातील 371(2) ब कलमाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी.
2. विशेष आर्थिक तरतूद: मराठवाडा वैद्यानिक विकास मंडळाच्या पुनरुज्जीवनासाठी 50,000 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात यावी आणि मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती केली जावी.
3. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार प्राधान्य: खाजगी कंपन्या आणि उद्योगांमध्ये मराठवाड्यातील स्थानिक भूमिपुत्रांना 80% नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यासाठी कायदा करण्यात यावा.
सत्ताधाऱ्यांवर टीका:
मधुकरराव भोळे यांनी सत्ताधारी पक्षांवर कडाडून टीका करत म्हटले की, “मराठवाड्याच्या जनतेला सतत फसवले गेले आहे. सत्तेत आलेल्या पक्षांनी मराठवाड्याच्या प्रलंबित मागण्यांकडे कायम दुर्लक्ष केले. आता हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भुमीपुत्र जन पार्टी सक्रिय राजकारणात उतरत आहे.”
भुमीपुत्र जन पार्टीने मराठवाड्याच्या विकासासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर करून आगामी निवडणुकीत हा मुद्दा प्रामुख्याने मांडण्याचा निर्धार केला आहे.
या पत्रकार परिषदेला पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड. नरहरी कांबळे, साहेबराव नलावडे, राजु भालेराव, सिद्धार्थ हिवराळे आणि जीवन शास्त्री उपस्थित होते.
पक्षाने स्पष्ट केले की, मराठवाड्याच्या मागण्यांसाठी आता केवळ आंदोलन पुरेसे नाही; तर ठोस राजकीय कृतीद्वारे हक्क मिळवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. हा निर्णय आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारा ठरेल.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HWWuRmwKsMAJMm50qaLtCn
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*